नकार
साधे -सोपे ,सरळ आणि सुंदर अशा व्याख्येत मोडायचे तिचे आयुष्य! नटणे- मुरडणे, सजने- सवरणे अशा गोष्टींपासून चार हात लांब असायची ती! तो हिंदी सिनेमा आहे ना ' कुछ कुछ होता है ' त्यातील अंजली सारखी.
पाहुणे मंडळी पाहायला येणार असे म्हटल्यावर तिला घरच्या स्त्रियांनी तिने कधीच न घातलेल्या अलंकारांनी नटवले. त्यावेळी ती खूप सुंदर दिसत होती. नव्या नवरीसारखी तिच्या गाली लाली आली होती, चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि त्यात भर जरतरी साडीची. साडी नेसल्यावर ती नेहमीपेक्षा उठून दिसत होती. तिने स्वतःला आरशात पाहिले. आपण असेही सुंदर आहोत , मात्र आज थोडे वेगळे दिसतोय याची जाणीव तिला झाली. पाहुणे मंडळी येणार होती ; त्यांच्या स्वागतासाठी सर्व मंडळी सुसज्ज झाली." लेक हे परके धन शेवटी! " कांदे - पोहे देण्याचा कार्यक्रम झाला. पारंपारिक विवाह ठरवताना जे काही होतं अगदी तसच झालं. यात बदल इतकाच की मुला - मुलीला थोडा एकांत देण्यात आला. त्यात सुद्धा लहानग्यांची लुडबुड होतीच. कथेतील नायिका अर्थात दृष्टी आणि नायक सिद्धार्थ यांची एकमेकांसोबत ओळख झाली.
लग्नासाठी सिद्धार्थला एक सामान्य अशी गृहिणी नको होती. त्याने याआधी बऱ्याच मुली पाहिल्या होत्या. त्याला सर्व सामान्य वाटायच्या. अर्थातच पहिल्या भेटीत सर्व सामान्य वाटतात. प्रत्येक व्यक्ती ही एकसारखी नसते. विशेष नैपुण्य तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. दृष्टी जशी दाखवली गेली अर्थात टीपिकल कांदेपोहे टाईप! मात्र सत्य परिस्तिथी वेगळीच होती. दृष्टी मॉडर्न विचारांची, आधुनिक काळासोबत चालणारी, स्व:बळावर स्वतःचा व्यवसाय चालवणारी होती. तिच्यातील इतर गुण त्याच्या परिचयाचे नव्हते. मुलगी पसंद करण्याचा कार्यक्रम आटोपता झाला. मुलीच्या घरच्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. सर्वजण चिंतामुक्त झाले. जाताना पाहुणे फोन वर बोलणे कळवतो असे म्हणून गेले.
संध्याकाळी चार वाजता पाहुणे मंडळींचे उत्तर येणार होते. घरातील सर्वजण त्या फोनकडे टक लावून पाहत बसले होते. नकार हा सहज पचनी पडत नसतो. परिवाराला स्वतःच्या कानांवर विश्वास होत नव्हता. तिच्यासाठी ते पहिलेच स्थळ आले होते. मुलाने नकार दिल्याची ती वार्ता होती. नकाराचे मूळ कारण ती इतर मुलींसारखी सामान्य आहे इतकंच होतं.
या नकाराला सामोरे जात दृष्टी स्वतःच्या कामावर याचा कोणताच परिणाम होऊ नये या अनुषंगाने कार्यरत होती. काही महिन्यांनी तिची सिद्धार्थ सोबत भेट झाली. दृष्टीच्या घरच्यांनी तिला निवांत वेळ मिळावा यासाठी तिच्या मावशीच्या गावी पाठवले. रेल्वेने तिचा प्रवास सुरू झाला. त्याच कंपार्टमेंट मध्ये सिद्धार्थ तिला भेटला. ती त्याच्यावर बिलकुल नाराज नव्हती. तिने त्याच्याशी हसतमुख चेहऱ्याने हस्तांदोलन केले. त्याला चटकन लक्षात आले नाही. तिने यावर आपण मागे कांदेपोहे कार्यक्रमात भेटलो असल्याचे सांगितले. तो विचार करत होता. इतक्यात तिने सविस्तर घटना सांगितली. त्याच्या लक्षात आले पण ही मुलगी तीच आहे का? या संभ्रमात तो पडला. त्याच्या मनात गोंधळ चालू होता इतक्यातच तिने त्याच्या लग्नाविषयी विचारले. अद्याप कोणतीच मुलगी पसंत पडली नसल्याचे त्याने सांगितले. त्याने हेच वाक्य बसक्या स्वरात उच्चारले. यावर मोकळेपणे बोला, मला मैत्रीण समजू शकता. लग्न करायचा तर विचार आहे पण अजून राजकुमार भेटला नाही. खूप वेळ त्यांनी गप्पा मारल्या. एक चांगले मित्र - मैत्रीण बोलतात तशा गप्पा मारल्या. प्रवासात त्याला ती आवडू लागली. टीपिकल नव्हतीच ती मुळात. घरेलू, पारंपारिक तसेच आधुनिक काळासोबत चालणारी एक परिपूर्ण साथी जशी त्याला हवी होती अगदी तशीच होती ती. त्याच्या मनात आपण काय करून बसलो याची खंत होती. हा प्रवास संपूच नये असे त्याला वाटत होते.
खूप धाडसाने आपण तिला लग्नाचे विचारावे असे राहून राहून त्याच्या मनात येत होते. त्याला ज्या ठिकाणी उतरावयाचे होते ते ठिकाण मागे पडल्याचे त्याच्या लक्षात आले. तिच्या मावशीचे गाव चांदोली आले. तिला दूरवर चालत जायचे होते. तिने त्याला कुठे उतरायचे आहे हे विचारले, त्याने इथेच असे खुणावले. दोघेजण उतरले. सर्व सामान घेऊन चालू लागले. तिने लाल घागरा व रंगीबेरंगी स्कार्फ घातला होता. ती उतरल्यावर एका नदीकडे धावत सुटली. सिद्धार्थला तिने तिच्याकडे येण्याचा इशारा केला. तिच्या पैजणांचा आवाज त्याला अधिकच भुरळ पाडत होता. त्याने तिला विचारायचे धाडस केले. बोलताना अडखळू लागला. शब्द ओठांवर रेंगाळू लागले. तिच्याकडे पाहत रहावेसे त्याला वाटले. ती पाण्यात पाय बुडवून मनसोक्त बोलत होती. तिचे बोलणे थांबवत शेवटी तो मनातले बोलून गेला. त्याच्या कंठातून दबका असा स्वर बाहेर पडला. "मं... मं...माझ्याशी लग्न करशील....? तू रागावली नाहीस ना? " तिचे उत्तर ऐकून घेण्यासाठी त्याचे मन व्याकुळ झाले होते.
तिला तो केव्हाच पसंत पडला होता. त्या नकाराने मात्र तिचे मन दुखावले होते. त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा तिच्या मनात उरली नव्हती. अशा व्यक्तीने आपल्याला एका साडीत पाहून आपल्याविषयी जे काही मत बनवले, ते तिला जाणून घ्यायचे होते. खूप कमी वेळात आयुष्याचा निर्णय कसा घेता येतो हे तिला ऐकुन घ्यायचे होते. तो फक्त एक वाक्य बोलला. " दृष्टी तू सामान्य असूनही असामान्य आहेस. मला तुझी साथ म्हातारपणात सुद्धा हवी! मला जमलं तर माफ करशील ?" या उद्गाराने तिने त्याला गच्च पकडून मिठी मारली. त्याच्या खांद्यावर पडणारे अश्रू तिच्या मनातले बोल सांगत होते. सिद्धार्थच्या आयुष्यात एखादा चमत्कार व्हावा तशी त्याला दृष्टी मिळाली. तिने मारलेल्या मिठीतून कधी मुक्तच होऊ नये असे त्याला वाटत होते.
- मयुरी खानविलकर, सातारा

अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद😊
ReplyDeleteभावस्पर्शी
ReplyDeleteमी एक छंदासी😊 धन्यवाद atul sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteStory mdhye आलेले वळण या मुळे story रंजक झाली.अप्रतिम लेखन
धन्यवाद 😊
ReplyDeleteIts awesome... a real love story can never have an end.... well written Mayuri... keep the same work
ReplyDeleteThanks a lot.... definitely I try😊
ReplyDeleteजिव्हाळाचा प्रेमबंधाचा जवळीक अन नाजुक विषय..👍
ReplyDeleteखूपच अप्रतिम मयुरी. अगदी मनाला हवं हवंस वाटणार मनाच्या जवळ असलेलं नातं कस असत. आणि मनाचे धागे जिथे जुळलेले असतात ते शेवटी जुळून येतातच. Keep it up dear
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ....आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लेखनासाठी प्रोत्साहन देतात.😊
ReplyDeleteअप्रतिम..
ReplyDelete