**प्रेमाचे अंतरंग.... Love yourself💞*

**प्रेमाचे अंतरंग.... Love yourself💞* 



     मी कसा दिसतो/ दिसते....? आरशात पाहून एखादी नक्कल करणे ,चित्रपटातील अभिनेता/अभिनेत्री प्रमाणे बोलणे , त्यांची शैली आपल्या जीवनात अवगत करून त्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आले का? बाह्यरूपावरून स्वतःला ओळखणे म्हणजे प्रेम आहे का? कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का?

   "स्व:" ची जाणीव होणे अर्थात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणे होय. यामध्ये शारीरिक , मानसिक इत्यादी बाबी येतात. जे व्यक्ती स्वतःला पूर्णतः समजून घेतात ते सहजरीत्या इतरांनाही समजून घेऊ शकतात. 
 
         ज्या व्यक्ती स्वतःवर प्रेम करतात त्या सहजपणे इतरांवर करू शकतात. याचा अर्थ प्रेम या संकल्पनेत आपल्या आसपास आढळणारे व्यक्ती असोत किंवा काही गोष्टी असोत आपण त्यांच्यावर सहजरीत्या निरागसपणे प्रेम करत असतो. 'प्रेम' या भावनेचा थेटपणे संबंध हा बाह्य रूपाशी नसून मनाच्या अंतरंगाशी असतो. आपण स्वतःला सर्वाधिक जाणत असतो. आपले गुणदोष आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असतात. स्वतःवर प्रेम करण्यासाठी फार काही करावे लागत नाही फक्त स्वतःला वेळ द्यावा लागतो. मन भरून जगणे म्हणजे काय तर स्वतःच्या आवडी जोपासणे! उदाहरणार्थ एखाद्याला फिरण्याची आवड असेल तर फिरण्यासाठी जाणे, संगीताची आवड असेल तर गायन करणे वा शिकणे.  आजकालच्या ताणतणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे बर्‍याच जणांचे म्हणणे असते. भवितव्याकडे लक्ष देता- देता आपण कुठेतरी स्वतःला हरवून तर बसत नाही ना? आपल्या इच्छांची  आपण घुसमट तर करत नाही ना? यासाठी स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे! 

         स्वतःवर प्रेम म्हणजे आपले समाधान नेमके कशात आहे हे ओळखणे. आवड जोपासणे म्हणजे विविध चित्रपटांचा, नाटकांचा आनंद घेणे, एक रसिक, एक श्रोता म्हणून त्यातील आशय व्यक्तिगत जीवनात कसा लागू पडेल याकडे लक्ष देणे. समाजकार्यात भाग घेणे हा देखील परमानंदासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. जे व्यक्ती इतरांत समाधान शोधू शकतात त्यांना समाधनासाठी फार दूर जावे लागत नाही. 

        जेव्हा आपण आपल्या गुणदोषावर टिप्पणी करतो, टीका करतो त्यावेळी आपण आपले व्यक्तिमत्व सुधारण्याच्या दृष्टिकोनाने वाटचाल करीत असतो.  आपल्यात काही उणिवा असतात त्या उणिवा गृहीत धरून आपणच आपले परीक्षक तसेच मार्गदर्शक ही बनत असतो. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू लागतो तेव्हा आपण जगणे मन भरून जगत असतो .आपण आपले आवडते छंद ,व्यासंग जपत असतो.भवितव्याकडे लक्ष देऊन आपल्या ध्येयाला पूर्तता देण्यासाठी प्रगतीचे पंख अवकाशाच्या दिशेने गरुडासम फैलावित असतो. यात अनेक अडथळे आले तरीही आपण त्या अडचणींवर मात करू शकतो कारण त्या प्रकारचे गुण आपण संपादित करू शकतो. जेव्हा आपण  एखादा संकल्प मनाशी घट्ट करून काहीतरी बनण्याचा निर्णय घेत असतो त्यावेळी आपण स्वयंप्रेरणेने आपले ध्येय साध्य करतो. 
      
           वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्याला कोणीतरी हवेहवेसे वाटत असते आणि हे वाटणे म्हणजे साहजिक नैसर्गिक आहे. जेव्हा आपण भवितव्याच्या मार्गाने मार्गक्रमण करीत असतो तेव्हा आपल्याला कोणावर तरी प्रेम होत असते मात्र प्राधान्य कशाला द्यावे या गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतो. प्रेमातून प्राप्त होणारे नैराश्य, एक तर्फी प्रेम ,व्यसनाधिनता, ध्येयाप्रती दिशाभूल होणे आणि भविष्याचा विचार न करता भावनिक होणे, स्वतःलाच त्रास देणे या गोष्टी आपल्याला स्वतःवर घृणा करण्यासाठी भाग पडतात. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करीत असतो तेव्हा आपण स्वतःच्या गुणदोषांचा आराखडा अखित असतो.  आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करू इच्छितो त्या व्यक्तीच्या गुणदोषांचा आराखडाही अखित असतो. एखाद्या व्यक्तीसाठी आपले आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नसतो. 'प्रेम' या संकल्पनेत आंधळे होऊन विचार न करता विवेकी होऊन डोळसपणे विचार करायला हवा. जेव्हा इतरांवर प्रेम केले जाते तेव्हा त्यात काळजी, चिंता येणे स्वाभाविकच आहे . मात्र या काळजी पायी स्वतःला दुखापत करून घेणे कधीही अयोग्यच! 

       बऱ्याचदा सहजीवनात जोडीदाराच्या आवडीनुसार वागण्याची वेळ येते. याचा अर्थ स्वतःला दुय्यम लेखणे हा मुळीच नाही. कुटुंबात सुद्धा अनेक वेळी काही गोष्टींना मन मारून जगावे लागते. कोणतीच गोष्ट ही कायम नसते. प्रत्येक  समस्येवर तोडगा असतोच. प्रसंगानुरूप त्यावर मंथन करणे आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत उपयोगी ठरते. स्वतःचा विचार करताना इतरांचा विचार केल्यास दबाव निपजतो. त्याद्वारे सुखाचे स्थैर्य लाभत असते. मनाची होणारी घालमेल थांबवणे सोईस्कर पडते. 

       कामाच्या वेळी स्वत:कडे दुर्लक्ष होत असते. त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. काम कोणतेही असो, त्यातून समाधान मिळत आहे का? ज्या सुखाची अपेक्षा आहे ते साध्य होत आहे का? अशा काही प्रश्नांची उकल करणे म्हणजे अर्थातच स्वतःवर प्रेम करणे होय, स्वतःला कामातील आनंद प्राप्त करून देणे होय.

" *शोधावे प्रेमाचे अंतरंग* 
 *पाहावे प्रेमाचे अंतरंग* 
 *जाणावे प्रेमाचे अंतरंग* 
 *जगावे प्रेमाचे अंतरंग!* "

        मनुष्यप्राणी स्वतःसाठी जगत असतो, स्वतःसाठी श्वास घेत असतो. जीवनाच्या प्रवासात तो आपले ध्येय साधत करत असताना अनेक व्यक्तींवर जीव लावून बसतो, नाते तयार करून बसतो. प्रेमात रममाण होतो . उतारवयात जेव्हा तो भूतकाळाचा विचार करतो तेव्हा आपण स्वतःला वेळ देऊ शकलो नाही, स्वतःसाठी जगू शकलो नाही याची चूनुक कुठेतरी हृदयावर खोल उमटलेली त्याच्या लक्षात येते.
  
    तर मित्रहो, स्वतःवर प्रेम करताय ना? जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुम्ही इतरांवरही प्रेम करू शकता आणि त्या प्रेमाचा आनंद श्वासाअखेरपर्यंत टिकून राहतो. 

- मयुरी खानविलकर, सातारा

Comments

  1. या जीवनात ध्येय गाठण्यासाठी आपण कधी आपल्या इच्छा आकांक्षा ना विसरून जातो हे....
    आपलं आपल्यालाच कळत नाही .
    आपण आपल्या साठी कधी जगणार ...
    स्वप्न इच्छा प्रत्येकालाच असतात.
    पण इतरांच्या सुखासाठी आपण आपल्या जीवनाच्या इच्छा ना कुठे तरी विसरत जातो.व जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा मग आपल्या कडे काही च राहत नाही फक्त पश्चात्ताप केल्या शिवाय .
    आपण खरच आपल्या वर प्रेम करायला पाहिजे.
    आपल्या ला त्या गोष्टी तुन खुप समाधान भेटते

    खरंच ताई खुप चांगला लेख लिहला तु

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!