*प्रेमाचं परिघ* ❤️


       'प्रेम' या विषयावर कितीही लिहिलं तरी विषय काही संपत नाही. प्रेम हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर तरुणाई दिसते पण प्रेम ही संकल्पना तेवढ्यापुरती मर्यादित नाही. विचारून पहा स्वतःला प्रेम म्हटलं की तुमच्यासमोर काय येतं? आपल्याला लहानपणी कोणी हा प्रश्न विचारला तर आपलं पहिलं उत्तर आई- बाबा असतं. कालांतराने हे उत्तर बदलत देखील जातं. आपल्या आवडी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या असतात. मग आपण प्रेमाला फक्त काही गोष्टींपुरतं मर्यादित का ठेवावं? तरूणांनीच प्रेम करावं किंवा प्रेमात पडावंच असंही नाही. 

  " आभाळ घे मुठीत आता

प्रेमाचे कर बंध खुले!"!"

     "प्रेम आणि आकर्षण" यातील फरक समजत नसणाऱ्या वयात आपण प्रेमातच पडलेले आहोत ही संभ्रमावस्था कित्येकांच्या मनात असते. प्रेमाचं रोपटं फुलण्याच्या आत कोमेजून जातं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. खरं प्रेम, खोटं प्रेम काय असतं याचं प्रशिक्षण शिबिर कोणीतरी आयोजित करावं आणि आपण ते सारं समजून घ्यावं असं अचानक घडत नाही.  प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं यावेळी " व्यक्ती तितक्या प्रकृती! " ही उक्ती अनुरूप ठरेल असं वाटतं. प्रेम हे मिळेलच असंही नसतं. खरं प्रेम ओळखणं आणि ते टिकवणं अत्यंत महत्त्वाचं! मुळात प्रेम ही मिळवण्याची गोष्ट नसते मात्र आपला मानस कुठेतरी ती व्यक्ती वा गोष्ट मिळवणे असतो.

  

     आपले तरूण मित्र प्रेमाचा शोध घेतात. प्रेम म्हणजे एक खास व्यक्ती आयुष्यात यावी ; त्या व्यक्तीच्या येण्याने जगणं बदलून जावं असं वाटू लागतं. पाऊस, चंद्र- तारे या गोष्टींमध्ये आपण प्रियकर पाहतो. प्रियकर सुंदर असावा अशी अपेक्षा करतो. प्रेम म्हणजे एक सुंदर भावना आहे ज्यामुळे दुःखातही आपण नव्या उमेदीने आयुष्याला वळण देऊ शकतो. प्रेम अंतरंगावर केलं तर आयुष्याला कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही. 


         जर ती व्यक्ती काही कारणास्तव कायमची दूर गेली असेल किंवा दूर जाणं भाग पडलं असेल तर व्यसनाच्या आहारी जाणं कितपत योग्य? प्रेमभंग झाल्यावर आपण स्वतःला त्रास देऊन ते प्रेम परत मिळेल ही अपेक्षा तरी का करावी? प्रेमात यश-अपयश याचा विचार करताना आपण स्वतःला उद्ध्वस्त का करून घ्यावे? स्वतःवर प्रेम करत असताना स्वतःला दुखावण्याचा विचार येत नाही मग का करावा हा वेडेपणा? स्वतःला इजा पोहचवून काहीच साध्य होणार नाही. प्रेमातून आलेलं नैराश्य ही भयंकर समस्या आहे मात्र त्यावर उपायही आपल्याच हातात आहे. 


      माझी एक वर्गमैत्रिण आहे, तिच्या आयुष्यात पण असंच काहीसं घडलं. जे घडलं त्यातून तिने नकारात्मक होण्याऐवजी आयुष्याला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. प्रेमातून येणाऱ्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतः खूप मजबूत बनली. आपण ठरवलं तर ते शक्य आहे. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावर ते अवलंबून आहे. दुसरा एक मित्र आहे त्याच्या आयुष्यात पण असंच घडलं. बघा ना आपण स्वतःला किती गोष्टींमध्ये गुंतवून घेतो की त्यातून आपल्याला स्वतःचीच सुटका करून घेता येत नाही. एका व्यक्तीपायी आपण इतरांचा विचार करणेच बंद करतो. मग जरी दुसरं प्रेम आयुष्यात आलं तरी आपण बहिरेपणाचं सोंग घेतो. असे कितीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात पण आपण त्याचा सामना कसा करायला हवा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. 


   "प्रेमाचा परिघ ओलांडावा

आभाळही ठेंगणे वाटते

    का रोखावे बिंदूंना वर्तुळात ?

क्षितिजापलीकडे प्रेम दाटते!"


       प्रेम एकदाच होतं, एका व्यक्तीवर होतं या वाक्याला ब्रीदवाक्य समजून आपण मनात बिंबवलंय. प्रत्येकाच्या बाबतीत असं नसतं. आपल्या आयुष्यात नवनवीन व्यक्ती येतात मात्र आपण डोळे झाकून जुन्या व्यक्तींच्या विचारात गुंग असतो. चित्रपटातून काही गोष्टी स्वतःशी संबंधित आहेत असं मानून आपण तशाप्रकारे जगू लागतो. आपण उपभोगाच्या दृष्टीने जर प्रेमाकडे पाहिले तर ते क्षणिक मिळेल मात्र त्याने समाधान मिळू शकणार नाही. 

आयुष्यात एक व्यक्ती म्हणजे सर्वस्व नव्हे! अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यावर आपलं प्रेम असतं. कधीतरी आपल्या छंदांवर, स्वप्नांवर प्रेम करून पहा नक्कीच तुम्ही समाधानी व्हाल. मित्रहो प्रेमाचा विचार करत असाल तर प्रेमाच्या वर्तुळाबाहेर जाऊन बाह्य गोष्टींचा विचार करायला शिकायला हवं. 

    " व्यास कर मोठा या वर्तुळाचा 

     सीमेत बंदिस्त ते प्रेम नव्हे! "


तुम्ही कोणत्या गोष्टींवर प्रेम करता? मला आवर्जून सांगा. मी वाट पाहते हं! 

तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 

- तुमची मैत्रिण 

मयुरी

Comments

  1. अप्रतिम मयुरी जी ,
    कविता मनामध्ये घर करून जाणारी आहे

    ReplyDelete
  2. छान. शब्द खूप आहेत भावना ही खूप आहेत .पण आता प्रेमाचं गाव सोडून खूप दिवस झाले पुन्हा त्या गावाला गेलो तर सगळीच माणसं ओळखीचा हाका मारतील आणि पुन्हा तेच जग जिवंत होईल. आणि पुन्हा एकदा रिकामी आता नाही यावं लागेल यासाठी त्या गावाचा पत्ता नको विचारायला कुणाला. खूप छान लेखन केले

    ReplyDelete
  3. प्रेम या शब्दांवर माझ्या कडे खुप काही आहे.
    पण या लेखात जे आहे ते खरंच खुप चांगल्या प्रकारे व्यक्त केले तुम्ही..!
    एक उत्तम लेख आहे हा

    ReplyDelete
  4. अप्रतिम मयुरी खूप सुंदर लेख👏

    ReplyDelete
  5. Nice mam, your thinking is too good 😊😊😊 and love it

    ReplyDelete
  6. खुप मस्त लेख आहे😍☺

    ReplyDelete
  7. एकदम बरोबर आहे.. या गोष्टींवर कुठे चर्चाच होत नाही.. त्यामुळे कितेक जण गैरसमज करून घेतात.. आणि त्यामुळे प्रेमाबद्दल वेगवेगळ्या समजुती केल्या जातात.. ज्या की खऱ्या नसतात... अप्रतिम ताई.. खूप सुंदर अगदी मनातलं लिहलय ग..🤩💯☺️.. आणि आम्ही तुमच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो वाचता वाचता 😅💖... mind-blowing 😍

    ReplyDelete
  8. प्रेम नुसतं शरीर नाहीत स्त्रीलिंग पुल्लिंगी,नाहीत नुसते बोलके बोल आणि आश्वासनाची ढिगारे, प्रेम तू म्हल्यासारखं असावं आपल्या छंदावर ,स्वप्नांवर,स्वतःवर त्याच पण मोजमाप नसावं💓लेख छान आहे💯

    ReplyDelete
  9. धन्यवाद आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया खरंच लेखनासाठी बळ देतात.😊

    ReplyDelete
  10. प्रेम या भावनेची ओळख पटवून देणे खूप च तसे अवघड आहे पण तेच काम तू अगदी सोप्या आणि सरळ भाषेत केलंय असे म्हणावे लागेल .... अप्रतिम लेखन ....माझे प्रेम कोण आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे म्हणून ते आता इथे सांगण्याचा वेगळेपणा माझ्या हातून घडणार नाही .😎❣️

    ReplyDelete
  11. आपण प्रत्येकजण जो विचार करतो तेच इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे... तुमच्या प्रतिक्रिया व संवाद खूपच अनमोल आहे 😊

    ReplyDelete
  12. मयुताई तुझे लिखाण नेहमीच काळजाला हात घालते नेहमी ज्या भावना व्यक्त करता येत नाही त्या तू लेखातुन सहज व्यक्त करते प्रत्येक वेळी सामाजिक संदेश जाईल काही चुकीचा समज आहेत त्यावर विचार करायला भाग पाडते प्रेम हे या समाजात काही चुकीच्या शब्द बांधले गेले आहे त्याच चुकीच्या समजाला तू येथे दुर केले आहे

    ReplyDelete
  13. सुंदर ग तायडे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!