तू कुठे कलेक्टर होणार आहे....?

     मस्तकात सरकन चुणूक आली. वाटलं प्रतिउत्तर करावं आपल्या प्रहारी भाषेत! " साऱ्याच कळ्यांना हक्क आहे उमलण्याचा !" हे आपसूकच आठवलं. नंतर शांत होऊन विचार केला आणि म्हटलं अशी मानसिकता असणारे भरपूर लोकं आहेत. कोणाचं तोंड बंद करणार?  बरेच दिवस मनातले शब्द उतरवण्याची इच्छा होती. नवदुर्गा निमित्त आज लेखाच्या माध्यमातून बोलावं म्हटलं!

     एकीकडे स्त्रिया पुरूषाच्या खांद्याला खांदा मिळवत आहेत. एकीकडे तिला कमी लेखणारे, पुढे न जाऊ देणारे लोक पण कमी नाहीत. स्त्री - पुरूष तुलना या समस्येवर मुळापासून घाव घातला जात नाही. अचानक संपूर्ण समस्या संपेल असंही नाही. शिक्षणक्षेत्रात खूप बदल होत आहेत. आपण मात्र शिकूनही अडाणी असल्यासारखी गत! जर प्रत्येकाने कलेक्टर व्हायचे स्वप्न बाळगले तर इतर क्षेत्रात काम करणार तरी कोण? शासकीय परिक्षा देऊन पैसा कमावता येईल. कोणाला वाटतं आपण मोठे नको व्हायला परंतु सर्वांनी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले तर कसे चालेल?
  
     नवदुर्गा म्हणजे देवीची नऊ रूपे. शक्तीची, सामर्थ्याची विविध रूपे! एकीकडे देवीचे पूजन करून दुसरीकडे देवीच्या रूपांकडून काहीच गुण अवगत करू नये अशी परिस्थिती पहायला मिळते. स्त्री हे सहनशीलतेचे, संवेदनशीलतेचे प्रतिक म्हणावे लागेल. पुरूष पैसा कमावून आणतो म्हणून तो मोठा होतो असे नाही .तोच पैसा जेव्हा तो व्यसनापायी उधळतो तेव्हा एकमेव त्याची जीवनसंगिनी असते जी सारं सहन करून घरदार जगवत असते. अशा स्त्रियांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी. ती कोणती अधिकारी नसते मात्र तिला व्यवस्थापन कसं करायचं हे चांगलंच ठाऊक असतं.

    खेळताना सोईस्कर कपडे घालावी लागतात. तोकडे कपडे घालून घाणेरड्या नजरा आपल्या मुलीवर पडतील म्हणून पालक तिला खेळण्यापासून थांबवतात. अत्याचाराची भीती घालतात. तिच्या स्वप्नाला मूठमाती देत त्याची राखरांगोळी करून टाकतात. प्रत्येकाचं स्वप्न, आकांक्षा वेगळ्या असतात. मागे आम्ही करत असलेल्या नाटकात मुलीचे संवाद खूप वेगळे आहेत म्हणून तिच्या घरातल्यांनी तिला नाटकातून बाहेर हो असे सांगितले. रंगमंचावर ते जरी नाटक असलं तरी प्रत्यक्षात ते एक कटू सत्य असतं. आपण स्वतःला समजून घेत स्वप्ने पाहण्याचा व ती जिद्दीने पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचा प्रयत्न करायला हवा. आजूबाजूच्या स्त्रियांचा आदर्श घेऊन आपण आपले ध्येय गाठायला हवे. स्वप्न हे फक्त मनात पुसट न ठेवता ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.आयुष्यात स्वतःचं अस्तित्व मात्र नक्कीच असायला हवं.


 

     तू कुठे कलेक्टर होणार आहे? असे म्हणत गप करणाऱ्या लोकांची मानसिकता बदलण्याऐवजी आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याची गरज आहे. अधिकारी नसूनही जेव्हा आपण आपल्या नजरेत उंच वाटतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालेलो असतो. घरातील गृहिणी जिला आपण कमी लेखतो ती सर्वांपेक्षा मोलाची वाटते. रानात घाम गाळणारी स्त्री, मजूर म्हणून काम करणारी महिला यांकडे आपण लक्ष देत नाही. ज्या स्त्रिया बाहेर काम करतात, सामाजिक कामात पुढाकार घेतात त्यांचे कौतुक तर आहेच पण इतर स्त्रिया ज्यांचा नामोल्लेख कुठे दिसत नाही त्यांनी स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खऱ्या अर्थी त्याच कुटुंबासाठी मोठ्या अधिकारी असतात. ज्याप्रमाणे बाहेर क्रांती निर्माण करणारी स्त्री असते त्याचप्रमाणे घरातदेखील ती एक मोठी क्रांती असते फक्त त्या क्रांतीला तिच्यातील प्रकाशाची जाण नसते. जिजामाता, सावित्रीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांनी क्रांतीची लाट आणली. त्यांचा उद्देश फक्त स्वतःपुरता नसून अखंड स्त्री जातीच्या परिवर्तनाचा होता. काळ लोटला तरी त्यांनी दिलेली स्फूर्ती, ऊर्जा अजूनही तशीच आहे.


अस्तित्व तुझे निर्माण कर आता
मुठीत या सामर्थ्याला धर आता....
कित्येक अडथळे मार्गात तुझ्या
स्वप्नांचे मार्ग सर कर आता!





    एका मित्राने गमतीत विनोद केलेल्या वाक्यातून खूप प्रेरणा मिळाली. जेव्हा स्त्रिया आतून पेटून उठतील तेव्हा त्या स्वः अस्तित्वासाठी धडपडतील. स्वाभिमान बाळगत त्या सक्षम होतील. स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांची गळचेपी करणारी दुर्गा प्रत्येकीने बनायला हवं. आपली विवंचना करणारे, आपल्याला डावलणारे हजारो हात आहेत मात्र एक हात स्वतःसाठी नक्कीच तयार ठेवावा. काळ आधुनिक असला तरी परिस्थिती पूर्णतः सुधारित नाही. वर्तमानपत्रात सामाजिक काम करणाऱ्या महिलांच्या विशेष बातम्या झळकत आहेत मात्र आपण देखावा पाहण्यात व्यस्त आहोत. रणरागिंनीकडून प्रेरणा घ्यायला हवी सोबतच कुठेच उल्लेख नसणाऱ्या असंख्य ज्योती आहेत त्यांच्याकडेपण पहायला हवे.

      तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की कळवा !
-तुमचीच मैत्रिण
मयुरी

- मयुरी खानविलकर, सातारा

Comments

  1. खुपचं सुंदर दिदी आज काळाची गरजच आहे मुलींनी महिलांनी आता दुर्गा बनायलाच हवं अन् या निच मानसिकते वर वार करायला सक्षम बनायलाच हवं

    ReplyDelete
  2. खूप छान लेखन केले आहेस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!