प्रेरक....!!
आपल्या आयुष्यात अशी एखादी तरी प्रेरणा असावी की जिच्यामुळे आपले आयुष्य सार्थक व्हावे. मग ती प्रेरणा पुस्तकांतून अमूर्त स्वरूपात किंवा प्रत्यक्ष व्यक्तींकडून मूर्त स्वरूपात दिसू शकते. प्रेरणा आयुष्याला नवे ध्येय देते. मग त्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते. क्षणार्धात प्रेरणा मिळताच संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. कोणत्याही कालखंडाचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्या -त्या कालखंडात लाभलेले व्यक्तिमत्व, पुस्तके ,उपभोगाची साधने ,गरजा यानुसार प्रेरणेचे स्वरूप ठरते. त्यानुसार आपले राहणीमान सुधारते, जीवनपद्धती सुधारते. आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होते.
भरकटत चाललेल्या तरुण पिढीला प्रेरणा मिळणे अत्यंत गरजेचे आहे .मग ती जवळच्या माणसांकडून, विविध चित्रपटांतून ,आपल्या विविध छंदांतून, आपल्या व्यासंगातून ,आपल्या राहणीमानातून, आपल्या कामकाजाच्या पद्धतीतून आपल्याला ती मिळत असते. संगत ही अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याच वेळी वाईट प्रेरणेतून अमानवी कृत्य घडल्याचे चित्र समाजात दिसते. सध्याच्या काळात निराशा, ताणतणाव हे भरपूर आहेत. बारीकसारीक गोष्टींवरून जगण्याचा आनंद हरवून पाहणार्या घटनांचा नकळत मनावर परिणाम होऊन त्यातून सुटका न होता गंभीर प्रकारचे मानसिक आजार उद्भवत आहेत. आणि जे लोक यातून सुटका करू शकत नाहीत ते दिशाहीन होताना दिसत आहेत. आयुष्यभर कुठेतरी त्यांचा जीवन प्रवाह खंडित झालेला दिसतो. याच्या पाठीमागे त्यांना प्रेरणादायी माणसे मिळाली नसतील!
शिक्षक हे एक उत्तम प्रेरणास्त्रोत म्हणता येतील तसेच कुटुंब, आपले नातलग आपले मित्र- मैत्रीण हेही आदर्श प्रेरणा स्त्रोत आहेत. जेव्हा आपण एखादा छंद जोपासत असतो तेव्हा यशाकडे जाण्यासाठी किंवा आपल्याला ती गोष्ट साध्य करण्यासाठी काही व्यक्ती सूचना देत असतात खऱ्या अर्थी ते प्रेरणा देत असतात त्या प्रेरणेमुळे आपण आपले भवितव्य निवडू शकतो. आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यास मदत होते तसेच प्रचंड आशावादी व्यक्तिमत्त्व आपले तयार होत असते.
लहानपणापासूनच पाठ्यपुस्तकातील धडे फक्त अभ्यासापुरते किंवा परीक्षापुरते न पाहता त्यातून आयुष्यातील प्रवाह खऱ्या अर्थी सकारात्मक दृष्टीने घेणे उपयुक्त ठरते. पुस्तक वाचताना पुस्तकातील माणसांकडून नकळत आपण प्रेरणा घेत असतो. त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ज्याप्रमाणे ते पुस्तकात रेखाटतात आपण त्याच प्रमाणे त्या पुस्तकांतून ,त्या माणसांकडून तशी प्रेरणा घेत असतो.
उदाहरण द्यायचे झाले तर झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे त्याला आसपासची परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहता येते त्यामुळे त्याला स्वतःला गरिबीतून मुक्त होऊन पुढे कसे जायचे आहे त्यासाठी नकळत त्याची परिस्थिती त्याला प्रेरणा देत असते. काही लोकांचे उदाहरण पाहता ते स्वयंप्रेरणेने झटत असतात. स्वयंप्रेरणेने काहीतरी बनू पाहतात .आपल्या आयुष्यात अनेक लोक ये-जा करत असतात काही लोक आपल्या सदैव लक्षात राहतात ते त्यांच्या सकारात्मक बोलण्यामुळे, सकारात्मक वागण्यामुळे आणि त्यांच्या सकारात्मक प्रेरणेमुळे !
आपण इतरांकडून प्रेरणा घेत असतो तशाच प्रकारे आपणही इतरांसाठी प्रेरणा बनायला हवे. यासाठी मनमोकळेपणाने संवादाचा आणि आपण जे आयुष्य जगत आहोत त्यातील समाधान शोधण्याची गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत बनणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेरणा ही लहानांकडून तसेच आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींकडून किंवा समवयस्क व्यक्तींकडून ही घेता येऊ शकते. व्याख्याने, कीर्तन ,भजन अभंग ही माध्यमे प्रेरणादायी बनतात कारण त्यामध्ये आपण आपले प्रतिबिंब पाहत असतो आपण त्या घटनांमध्ये आपल्याला कुठेतरी पाहत असतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये ,एखाद्या घटनेमध्ये , एखाद्या प्रसंगांमध्ये स्वतःला पाहतो तेव्हा आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. त्यासाठी चिंतन करणे सोईस्कर ठरते.
जीवनाचा प्रवास खडतर असला तरी तो सोयीस्कर बनवण्यासाठी सदैव एखादी प्रेरणा मागे असावी लागते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर एका ओळीतून ,एका क्षणातून ही प्रेरणा आपल्याला मिळून जाते. त्या प्रेरणेसाठी कुठेतरी कल्पनाविश्वात रमण्याची गरज नसते तर येणाऱ्या प्रत्येक अनुभवावरून, आपल्या विचार ग्रहण करण्याच्या पद्धतीवरून आपण ती प्रेरणा घेत राहतो.
आपण प्रेरणादायी बनण्याकडे वाटचाल करू लागतो. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करू पाहतो त्यावेळी आपण इतरांना सकारात्मक दृष्टी देत असतो आणि त्यासोबतच एका प्रेरणेचा ऊर्जास्रोत बनून जातो. विचारातून कृती घडणे अत्यावश्यक असून समाजहित साधणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी अद्वितीय प्रेरणा मिळते तिचे रूपांतर कृतीत होऊ लागते. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने मिळालेल्या प्रेरणेचा लोक कल्याणासाठी वापर, समाजाचे देणेकरी म्हणून एक भूमिका घेऊ लागतो. याचा उपयोग आपल्या सर्वांगीण जीवनात होतो.
मित्रहो तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनू शकता का?
प्रेरणा मिळाल्यावर त्याचा कशाप्रकारे जीवनात वापर करता?
लेखनात काही त्रुटी असतील तर आवर्जून कळवा... आपला अभिप्राय नक्की कळवा.
- मयुरी खानविलकर, सातारा.

लिहित जा तू. तुझ्या लेखणीत धार आहे
ReplyDeleteबदलत जा तू सर्व मानसिकता तुझ्या लेखणीचा तो अधिकार आहे
आपल्या अभिप्रायबद्दल मनापासून आभार...
ReplyDeleteलिखाण खरंच प्रेरणादायी आहे. शीर्षक अतिशय योग्य आहे.
ReplyDeleteलेख खूपच छान आहे.तुला जे काय म्हणायचे आहे ते तू अत्यंत योग्य शब्दात व्यवस्थित सांगितले आहे.छान लेख लिहिल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.असेच लिखाण पुढे भविष्यात चालू ठेव.
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक आभार... लेखन आपल्या प्रेरणेने चालूच राहील.
ReplyDeleteप्रेरणा ही प्रत्येक गोष्टीतून घेता येते हा मुद्दा खुप आवडला ताई आपण प्रत्येक गोष्टीतून कशी प्रेरणा घेतो व आपल्या आयुष्यात त्या प्रेरणेतून कशा प्रकारे बदलतो हे खरं च खुप महत्वाचे असते.आपल्याला प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा मिळते.....
ReplyDeleteखरं च खुप छान लेखन केले....
असंच सतत लिहत जा ताई तुझं लेखन खुप छान आहे...
खरंच उत्तम रीत्या व्यवस्थित मांडणी केली...
ReplyDeleteप्रेरणादायी विचार आहे ताई तुझे...
समाजातून अनेक गोष्टी तून प्रेरणा घेता येते...
फक्त ते आपल्या वर आहे आपण त्या गोष्टी ला कसं आपलंसं करतो